Most Popular

Header Ads

उद्धव काळापहाड- आवाजाचे वरदान आणि सामाजिक भान लाभलेला निवेदक

 समाजभान जपणारे अष्टपैलू सूत्रसंचालक उद्धव काळापहाड

भगवान राऊत

सूत्रसंचालक किंवा निवेदक हा एखाद्या रंगीबेरंगी फुलांच्या हारातील एक अदृश्य धागा असतो. जो स्टेजवरील मान्यवर व्यक्ती आणि समोर बसलेल्या श्रोत्यांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करतो. आयोजक, पाहुणे आणि श्रोते यांची दाद मिळवतो तोच यशस्वी सूत्रसंचालक किंवा निवेदक असतो. अशाच एका यशस्वी, हजरजबाबी, समयसूचकता आणि साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक भान जपणारा सूत्रसंचालक म्हणजे उद्धव काळापहाड. ज्यांना लोक प्रेमाने के.पी. या नावाने ओळखतात.
उद्धव काळापहाड यांचा जन्म पाथर्डी तालुक्यातील धारवाडी या छोट्याशा खेडेगावात झाला. धारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराजांच्या जन्मभूमीत म्हणजेच चिचोंडी शिराळ येथे त्यांचे 5 वी ते 10 वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण झाले. रेसिडेन्शिअल हायस्कूल अहमदनगर येथे 11 वी-12 वीचे शिक्षण तर कर्जत येथील विद्यालयात डी.एड.चे शिक्षण झाले. न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे त्यांचे एम.ए. समाजशास्त्र हे पदव्युत्तर शिक्षण झाले.
वारकरी संप्रदायाची कौटुंबिक परंपरा लाभलेल्या गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे घरातील आजी आणि मावशीच्या तोंडून अभंग, भजन, गवळण, भारूड कानावर पडत होते. आजीबरोबर भजन-कीर्तनाला जाण्याचा छंद त्यांना लहानपणापासूनच होता. वडील माजी सैनिक असल्यामुळे कुटुंबात शिस्त होती. आई, वडील, बहीण, भाऊ, आजी अशा एकत्र कुटुंबात वाढलेल्या उद्धववर देखील वारकरी सांप्रदायाचे संस्कार नकळत झाले होते.
शाळा-महाविद्यालयात असतांना वक्तृत्व, एकपात्री, वेशभूषा, गायन अशा विविध स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे. वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी अनेक बक्षिसे मिळवली. संत एकनाथांच्या सोंगी भारूडाचा आणि भजन-कीर्तनाचा भारी नाद उद्धवला होता. त्यामुळे वक्तृत्व स्पर्धेबरोबरच ते भारूड गायन स्पर्धेतही सहभागी झाले. ‘माझा रहाट गे साजणे’ हे पहिले पारंपरिक भारूड त्यांनी पारंपरिक वेशभूषेत सादर केले. ते उपस्थितांना आवडले. डी.एड.ला विद्यार्थी प्रतिनिधी असतांना त्यांनी वेशभूषा स्पर्धेत भाग घेतला आणि ह.भ.प. महाराजांच्या वेशभूषेत वारकरी सांप्रदायातील कीर्तन अभंग निरुपणासह सादर केले. या कीर्तनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. वक्तृत्व झाले, भारूड झाले, कीर्तन झाले आणि ते श्रोत्यांना आवडलेदेखील. त्यामुळे उद्धव यांची स्टेज डेअरिंग वाढली. शाळेतील विद्यार्थी-मित्र व शिक्षक यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले. 
या काळात नगरचे उभरते युवा वक्ते गणेश शिंदे यांच्या संपर्कात ते आले. गणेश शिंदे यांनी एका कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी उद्धवकडे दिली आणि तो कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. त्यावेळी तू चांगला वक्ता, सूत्रसंचालक, निवेदक होऊ शकतो त्याकडे गांभीर्याने लक्ष दे, असा सल्ला प्रा. गणेश शिंदे यांनी उद्धवला दिला. उद्धवचे डी.एड.चे शिक्षण पूर्ण झाले होते आणि ते नोकरीच्या शोधात होते. परंतु शिक्षक भरतीमधील भ्रष्टाचार पाहून आपल्याला पैसे देऊन शिक्षक व्हायचे नाही हे त्यांनी ठरवले. चांगली वैचारिक पुस्तके वाचणे, प्रसिद्ध वक्त्यांची व्याख्याने ऐकणे, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय सभांना उपस्थित राहणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा, माहितीचा उपयोग सूत्रसंचालन करताना कसा करून घेता येईल याकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष दिले. स्वतंत्रपणे सूत्रसंचालन करण्याचे धाडस त्यांनी केले.
केडगावचे नगरसेवक दिलीप सातपुते यांनी उद्धव यांना कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची पहिली संधी दिली. अर्थातच त्यामागे प्रा. गणेश शिंदे यांची शिफारस होतीच. नवरात्र महोत्सवात 7 दिवस केडगावमध्ये उद्धव यांनी धमाल केली आणि हा कार्यक्रम यशस्वी केला. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या ऑफर्स येऊ लागल्या. खर्‍या अर्थाने व्यावसायिक सूत्रसंचालक/निवेदन क्षेत्रात त्यांचे पदार्पण झाले.
डी.एड.ला असतांना उद्धव यांचे शब्दोच्चार अस्पष्ट होते. भाषा शुद्ध नव्हती. कधी बोलतांना बोबडे बोल यायचे तर कधी अक्षरशः तोतरी वळायची. त्यावेळी कर्जतला भरत वेदपाठक नावाचे पत्रकार-शिक्षक होते. ते उद्धवला समजावून सांगायचे. व्यंगावर मात करण्यासाठी उद्धव यांनी जिभेचे काही व्यायाम केले. आपल्या बोलण्यातील, शब्दोच्चारातील व्यंग घालवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. त्यानंतर मात्र त्यांचे शब्दोच्चार स्पष्ट झाले. भाषा सुधारली. संवाद साधण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले. त्याबद्दल भरत वेदपाठक या आपल्या गुरूला ते श्रेय आहे, असे उद्धव प्रामाणिकपणे कबूलही करतात.
गेल्या 10 वर्षात उद्धव यांनी हजारो कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व निवेदन केले. स्टेज शो, आकाशवाणी, दूरदर्शन मालिका, साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय अशा अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे स्वरूप, कार्यक्रमाचे ठिकाण, स्टेजवर उपस्थित असलेले मान्यवर पाहुणे आणि समोर बसलेले श्रोते या सर्व अंगाचा विचार करून सूत्रसंचालन/निवेदन कशा शैलीत करावे हे ठरवावे लागते. त्यासाठी अभ्यास, अनुभव, वाचनही लागते. सूत्रसंचालन हे पाल्हाळिक नको, चारोळ्या, सुविचार, विचारवंतांची वाक्यं, उदाहरणं, विनोद, संदर्भ यांचा अतिरेक किंवा भडिमार नको तर वेळेचे भान ठेवून बोलीभाषेत सूत्रसंचालन केले पाहिजे असे ते म्हणतात. थोडक्यात सूत्रसंचालक हा चतुर, हजरजबाबी असावा. शहाणा असावा मात्र अतिशहाणा नसावा. सूत्रसंचालक आपल्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे अशी भावना न होता तो श्रोत्यांना आपला प्रतिनिधी वाटला पाहिजे.
रसिक ग्रुपचा गुढीपाडवा महोत्सवातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचा अनुभव हा अविस्मरणीय क्षण आहे. रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी माझ्यावर विश्वास दाखवून एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधी दिली. त्यामुळे मला अधिक बळ मिळाले असे ते म्हणतात.
उद्धव काळापहाड हे सूत्रसंचालन/निवेदनाबरोबरच प्रचाराच्या ऑडिओ-व्हिडिओ क्लिप तयार करणे, न्यूज चॅनलला अँकरिंग करणे, टॉक शो घेणे, स्वतःचे के.पी. लाईव्ह नावाचे यू-ट्यूब चॅनल चालविणे, के.पी. पब्लिस्टिी ही फर्म चालवणे त्याचबरोबर ‘चहा-बिस्कीट आणि के.पी.’ हा लाईव्ह शो चालवणे अशा अनेक आघाड्यांवर ते व्यस्त असतात. त्यात सेलिब्रिटींच्या मुलाखती, ‘डिस्कव्हर महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटन स्थळांच्या भेटी अशा कार्यक्रमांचा समावेश असतो. के.पी. लाईव्ह वरील बच्चू कडू यांच्या बायोग्राफीस 30 लाख व्ह्युअर्स आहेत. तर त्यांनी भारताचे माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लिहिलेले भावनिक पत्रदेखील विधानसभा निवडणूक काळात खूप गाजले.
साम टीव्हीसह इतर चॅनल्सवरील बातम्यांना त्यांनी आवाज दिला आहे. विविध दैनिकातून त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेचे समीक्षण लिहिले आहे. दैनिक पुढारीचे प्रतिनिधी म्हणूनही ते कार्यरत आहेत. बहुरूपी कलावंतांच्या व्यथा-वेदना मांडणारी ‘साहेब आले’ या लघुपटाचे लेखन-दिग्दर्शन त्यांनी केले आहे. झी युवा वाहिनीवरील ‘तुझं माझं जमतय’ या मालिकेत भूमिकादेखील त्यांनी साकारली आहे. शिवाय धारवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणूनही ते निवडून आले आहेत. ‘असे करावे सूत्रसंचालन’ या विषयावर ते मार्गदर्शन करतात. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद, ‘बबन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊ कर्‍हाडे, आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आणि विद्रोही शाहीर संभाजी भगत या सेलिब्रिटीजच्या मुलाखतीदेखील त्यांनी घेतल्या आहेत.
सामाजिक बांधिलकी जपणार्‍या आणि सामाजिक भान असलेले उद्धव काळापहाड आपल्या व्यवसायातून मिळालेल्या आर्थिक उत्पन्नाचा काही भाग पूरग्रस्तांच्या मदतीसाठी, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीच्या आयोजनासाठी व इतर सामाजिक उपक्रमासाठीही मदत करतात. दैनिक लोकमतच्या ‘मंथन’ पुरवणीसाठी विविध विषयावरील लेखासाठी छायाचित्रणदेखील त्यांनी केले आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांसाठी अल्प मानधनावर सूत्रसंचालन करतात. ‘सूत्रसंचालक किंवा निवेदक झालो नसतो तर मला कीर्तनकार, शाहीर किंवा पोलीस अधिकारी व्हायला आवडलं असतं’, असं ते म्हणतात.
आगामी काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, कृष्णप्रकाश, ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या मुलाखती घेण्याची त्यांची इच्छा आहे. 
उद्धव काळापहाड यांना त्यांच्या सूत्रसंचालन-निवेदन क्षेत्रातील कामगिरीबद्दल राज्यकर्ता आदर्श निवेदक पुरस्कार, रहेमत सुलतान फाऊंडेशनचा ‘समाजमित्र’ पुरस्कार तसेच स्नेहालय संस्थेचा उत्कृष्ट निवेदक पुरस्कारदेखील मिळाला आहे. अनेक वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले आहे. आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील, आजी आणि असंख्य मित्रांना देतात.
श्री संत भगवान बाबांच्या जीवनचरित्रावर आधारित संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा त्यांना मानस आहे. या कार्यक्रमाची पूर्वतयारी सध्या ते करीत आहेत.
शब्दांकन ः भगवान राऊत, मो. 9822844080

Post a Comment

1 Comments